• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    अतिवृष्टीने शेतपिके भूईसपाट,त्वरीत पंचनामे करा, जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

    गुरूवारी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील दहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.या पावसाने शेकडो घरांची पडझड झाली असून, हजारो हेक्टरवरील शेतपिके भूईसपाट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
    दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले असून, येत्या सोमवारपासून प्रत्यक्ष पाहणी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.
    मागील 48 तासांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शुक्रवारी दुपारनंतर विश्रांती घेतली. शनिवारी विश्रांती घेत पावसाची रिपरिप सुरूच होती. मात्र, पावसाच्या तडाख्याने नदीकाठावरील शेतपिकांना तडाखा बसला. सर्वाधिक फटका चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, गडचांदूर, मूलसह अन्य तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात घरांची मोठी पडझड झाली असून, शेतपिके भूईसपाट झाली आहेत. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. मात्र, या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, परमडोली, करणकोंडी, कुंभेझरी, पाटागुडा, नागपूर, चिखली आदी गावपरिसरातील शेतकर्‍यांच्या शेतातील शेतपिके पुराच्या पाण्यात वाहून गेले. याशिवाय राजुरा, जिवती, व कोरपना तालुक्यातील रस्ते उखडले असून, काही रस्त्यांनी भगदाड पडले आहे. नुकसानग्रस्त शेतपिकांचे तातडीने पंचनामे करून आपादग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.