• Advertisement
  • Contact
More

    अभूतपूर्व गोंधळात बगीचा झाला आझाद ,आमदार जोरगेवारांची नाराजी, तर, आमदार मुनगंटीवारांचे आयुक्तांवर खापर

    चंद्रपूर : शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद बागेचे शनिवारी लोकार्पण अभूतपूर्व गोंधळात झाले. कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम मनपा आयुक्तांनी केल्याचे खापर विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी फोडले. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यात उशीर झाला. परंतु, आयोजकांनी तोपर्यंत कार्यक्रम आटोपता घेतला. यानंतर जोरगेवारांनी कार्यक्रमाला बोलावून साधी बैठक व्यवस्था केली नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावून अपमान करण्याचा कुणालाही अधिकारी नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. तर, खासदार बाळू धानोरकर यांनी लोकार्पण झाल्यानंतर मंचावर जाण्याऐवजी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
    चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा आहे. या बगीचात अबालवृद्ध विरंगुळा म्हणून येतात. परंतु, बगीचाची दुरवस्था झाल्याने मनपा प्रशासनाने नूतनीकरणाचे काम हाती घेतले. तब्बल सहा वर्षांनंतर आता बगीचाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मनपाने बगीचा लोकार्पणाचा सोहळा शनिवारी आयोजित केला होता. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापली. परंतु, त्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांची नावे पत्रिकेत नव्हती. त्यामुळे या सोहळ्यात राजशिष्टाचाराचा भंग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यानंतर नवीन पत्रिका छापली. कोनशीलेवरही नावे नमूद केली. सायंकाळी कार्यक्रमस्थळी आमदार सुधीर मुनगंटीवार पोहोचले. काही वेळात खासदार धानोरकरही तेथे आले. त्यानंतर मनपातील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी लोकार्पण सोहळ्याला सुरुवात केली.
    काही वेळात आमदार जोरगेवार आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यक्रमस्थळी पोहोचले. मंचावर भाषणबाजी सुरू होती. त्यानंतर आमदार जोरगेवारांनी माईक घेत बोलणे सुरू करताच प्रोटोकॉलनुसार बोलण्याची संधी मिळेल, असे सांगताच बोलणे थांबवून खाली उतरले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला बोलावून साधी बसण्याची व्यवस्था केली नसल्याबद्दल आमदार जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त करीत तेथून निघून गेले. आमदार मुनगंटीवार यांनी या अभूतपूर्व गोंधळाला मनपा आयुक्त मोहिते जबाबदार आहेत. आग लावून ते निघून गेले. चार महिन्यांपूर्वी त्यांची बदली झाली होती. परंतु, बदलीच्या कायद्याचे उल्लंघन करून केवळ भाजपला त्रास देण्यासाठी त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात आयुक्त मोहितेच्या काळातील भ्रष्टाचार उघड करणार असल्याची शपथ घेतली. या सर्व अभूतपूर्व गोंधळात बगीचा आझाद झाला असून, तो उद्यापासून चंद्रपूरकर नागरिकांसाठी मोकळा करण्यात आला आहे.