• Advertisement
  • Contact
More

    अवैध वैद्यकीय व्यवसाय करना-या बोगस डॉक्टरवर सावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    सावली तालुक्यातील कवठी येथील अजय सरकार या बोगस डॉक्टरच्या रुग्णालयात वैद्यकीय चमूने धाड टाकून मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर सावली पोलीस स्टेशन येथे अजय सरकार या बोगस डॉक्टरविरुद्ध २७६, ४१९ आयपीसी, सहकलम ३३ (२), ३३(अ), (२) महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिकाचा कायदा १९६१ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कवठी येथे मागील अनेक
    दिवसांपासून अजय सरकार नामक व्यक्ती अवैध वैद्यकीय व्यवसाय करीत होता. सदर बोगस डॉक्टर हा कोरोना काळात सावली येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्यास तपासणी करून घेतात व भरती करतात असे रुग्णांना सांगून स्वतः रुग्णावर उपचार करीत रुग्णांची आर्थिक लूट करीत होता. दरम्यान, त्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे १९ जून रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. थेरे यांच्या नेतृत्वात डॉ. गोबाळे व डॉ. यामजलवार यांच्या चमूने धाड टाकली होती.
    यावेळी रुग्णालयात अवैध औषध साठा आढळून आला होता. हा साठा जप्त करण्यात आला होता.. परंतु, डॉ. सरकार हा वैद्यकीय चमुच्या हाती लागला नाही. त्यानंतर पुन्हा १३ जुलै रोजी धाड घालून चौकशी करण्यात आली व पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान, पोलीस स्टेशन सावली येथे डॉक्टर अजय सरकारविरुद्ध आरोग्य विभागाने तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईने तालुक्यातील बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.