
चंद्रपूर जिल्ह्यात मातेच्या धाडसाने लहानग्या मुलीचे प्राण वाचले आहे. चंद्रपूर शहरालगत जुनोना गावाजवळ आई अर्चना मेश्राम मुलीसह गावातील नाल्याजवळ रानभाज्या तोडण्यासाठी गेली होती. भाज्या तोडत असताना थोड्या दूरवर चिमुकली प्राजक्ता उभी होती. एवढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राजक्तावर झडप घातली आणि थेट मुंडके जबड्यात घेतले. हा प्रकार पाहून भेदरून न जाता जवळ असलेल्या आई अर्चनाने काठीने बिबट्यावर प्रहार केले.
आईच्या दणक्यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून आईवर हल्ला केला. तरीही आईने हा हल्ला काठीच्या साहाय्याने परतवून लावला. मात्र बिबट्या दुसऱ्या वेळेस चिमुकलीला वळून फरफटत नेऊ लागला. आता मात्र आई अर्चनाची ‘दुर्गा’ झाली होती. तिने पुन्हा बिबट्यावर प्रहार केल्यावर मात्र यावेळेस घाबरून बिबट्या पसार झाला.
चिमुकलीवर उपचार सुरु
घटनेनंतर जखमी अवस्थेतील बेशुद्ध प्राजक्ताला घेऊन आईने तातडीने रुग्णालय गाठले. चंद्रपुरात उपचार झाल्यावर सध्या प्राजक्ता नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात चेहऱ्याच्या पक्षाघातावर उपचार घेत आहे. मातेच्या निग्रही प्रतिकारापुढे बिबट्यालाही पळ काढावा लागला. डॉक्टर्स ती स्वस्थ व्हावी यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.