• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हाल; कारण…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय सुरू होऊन सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु आजही हे महाविद्यालय अपूर्ण अवस्थेत आहे. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर पागलबाबा नगर येथे ९०० कोटी खर्च करून महाविद्यालयाच्या भव्य वास्तूचे काम सुरू आहे. परंतु ही इमारत पूर्ण होण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून हे महाविद्यालय रामनगर परिसरातील महिला रूग्णालयाच्या इमारतीमध्ये सुरू आहे. तिथेच विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे. दरम्यान कोविड महामारीत महीला रूग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालय खाली करून तिथे ४०० खाटांचे कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाला आता कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही. अशा कठीण स्थितीत प्रभारी अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वैद्यक महाविद्यालय सुरू करण्यासाठी वन विभागाकडे वन अकादमीच्या वास्तूची मागणी केली. परंतु ही इमारत मिळाली नाही. परिणामी कोविड संक्रमण ओसरल्यानंतर एमबीबीएस विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे तुकूम परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहात एमबीबीएस प्रथम, व्दितीय, तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या इमारतीत एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या लागणाऱ्या कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. कुठलीही इमारत मिळाली नाही म्हणून नाईलाजास्तवो या अडगळीच्या वसतीगृहात आता एमबीबीएसचे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले आहेत. सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे वर्ग येथे भरत आहे. महिला रूग्णालयापासून आदिवासी वसतीगृहाची इमारत साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येथे दररोज येणे जाणे करण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी दररोज शंभर रूपये भुर्दंड सहन करावा लागत आहे. एमबीबीएस विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक महत्वाचे असते. मात्र या इमारतीत तशी कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. “चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सध्या इमारत नाही. त्यामुळे भाजपाचे आमदार पंकज भोयर यांची इमारत भाडेतत्वावर घेतली आहे. तिथे शैक्षणिक वर्ग होत आहे. वन अकादमीची इमारत मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु अजून मिळाली नाही. या वर्षाच्या शेवटी किंवा नविन वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची बांधकाम होत असलेली इमारत मिळेल. अस बोलल्या जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले तेव्हा नियमित अधिष्ठाता म्हणून डॉ.एस.एस.मोरे होते. त्यांच्या बदलीनंतर येथे डॉ.हुमणे अधिष्ठाता झाले. त्यांची तीन वर्ष पूर्ण होण्याआधीच नागपूर येथे बदली झाली. त्यांचा प्रभार शरीरक्रिया विभागाचे विभाग प्रमुख डॉ.अविनाश टेकाडे यांच्याकडे सोपविण्यात आला. सध्या या वैद्यकीय महाविद्यालयाला नियमित अधिष्ठाता नाही.”वैद्यकीय महाविद्यालयाला नियमित अधिष्ठाता गरजेचा असतांना, एका विभाग प्रमुखाकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. विभागप्रमुख अधिष्ठाताच्या भूमिकेत वागत नसल्याने प्रशासकीय कामकाज पूर्णपणे खोळंबले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आता तर आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. हे अतिशय दुर्देवी आहे.”, असा आरोप केला जात आहे