• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराअभावी युवतीचा मृत्यू  
    दोषींवर कारवाई करण्याची मागणी

    रक्ताची कमतरता असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या एका १७ वर्षीय युवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सानिका कोंडुजी अनमुलवार असे मृत मुलीचे नाव आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील कोंडुजी अनमुलवार यांच्या सानिका या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला दाखल करून घेतले. वार्डात बेडसुद्धा देण्यात आला. मात्र, तासभराचा कालावधी लोटूनही डॉक्टर तेथे आले नाही. यात उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला. या प्रकाराने कुटुंबीयांनी रुग्णालयातील सुविधेविरोधात संताप व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.