• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  चंद्रपूर शहरात डेंग्यूची दहशत
  तुकुम, बाबूपेठ परिसरात सर्वाधिक रुग्ण

  पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. घाणीमुळे शहरात डेंग्युची साथ पसरली आहे. मागील पंधरा दिवसात शहरातील डॉ. गावतुरे यांच्या पॅथालॅाजीमध्ये डेंग्यूचे किमान शंभरावर रूग्ण पॅाझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात जवळपास शंभरावर खासगी पॅथालॅाजी आहेत. त्यामुळे शहरातील डेंग्यू रूग्णांच्या आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता महानगरपालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयातून डेंग्यूच्या रूग्णांची माहीत घेणे सुरू केल्याची माहिती आहे.
  इडिस इजिप्ती नावाच्या डासांच्या चावण्यामुळे डेंग्यूची लागण होते. डास वाढण्यासाठी आवश्यक परिस्थितीत शहरातील प्रत्येक प्रभागात आहे. त्यामुळे थोड्या पावसात अनेक प्रभागात गटार तयार होतात. त्यातून डासांचा प्रादूर्भाव वाढीला लागला आहे. त्याचा परिणाम शहरात घरोघरी तापांचे रूग्ण आढळत आहे. डॉ. राकेश गावतुरे यांच्या पॅथालॅाजी मध्ये तपासणीसाठी आलेल्या  रक्ताच्या नमुन्यांमध्ये पंधरा दिवसात जवळपास शंभरावर रूग्ण डेंग्यूचे निघाले असल्याची माहिती डॉ. गावतुरे यांनी दिली आहे.
  एकाच पॅथालॉजी मध्ये दोन आठवड्यात डेंग्यूचे एवढ्या मोठ्या संख्येत रूग्ण आढळले. शहरातील खासगी पॅथालॉजी आणि रुग्णालयांच्या संख्येचा विचार केला तर डेंग्यूच्या रूग्णांची आकडेवारी प्रशासनाची झोप उडविणारी आहे. शहरातील तुकूम आणि बाबुपेठ परिसर डेंग्यूचा हाटस्पॉट झाला आहे, असेही डॉ. गावतुरे यांनी सांगितले.
  एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या, त्वचेवर व्रण उठणे ही लक्षणे असल्याचीही माहिती डॉ. गावतुरे यांनी दिली. सोबतच शहरात डेंग्यूचा फैलाव होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नियमित फवारणी सुरु आहे. नागरिकांनीही घरी पाणी साचून राहू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन उपायुक्त विशाल वाघ यांनी केले आहे.