• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    जिवती तालुक्यात जादुटोना भानामती’च्या संशयावरुन दलित समाजातील लोकांना बांधून मारहाण

    चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून दलित समाजातील काही लोकांना भरचौकात त्यांचे हातपाय बांधून जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र कुणावर केला, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. गावाच्याबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्तही आहे. कुणालाही गावात येऊ दिले जात नाही आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी ही घटना असतानाही या प्रकरणाबाबत पोलीस मात्र अतिशय गोपनीयता बाळगत असल्याचे दिसून येते.
    शहर विकसित होत असले तरी गावखेड्यातून अजूनही अंधश्रद्धा गेलेली नाही, हे या समाजाला काळिमा फासणाऱ्या घटनेतून समोर येते. केवळ अंधश्रध्देला बळी जाऊन गावकऱ्यांनी मिळून दलित समाजातील लोकांना मारहाण करणे अतिशय क्रूर असल्याचे आता बोलले जात आहे. विशेष म्हणजे, वृद्ध, महिला, लहान बाळ कोणाचाही विचार न करता बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूरला हलवण्यात आलेले आहे. एवढा सगळा प्रकार होत असतानाही पोलीस प्रशासन झोपले होते काय, असा प्रश्न आता पुढे येत आहे. सध्या शांतता आहे. गावात कुनालाही जाऊ दिले जात नसल्याने या प्रकरणाबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. मात्र मारहाण झालेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना गाव सोडावे लागले  ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील ही घटना घडताना काय करीत होते, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.