
बंदुकीच्या धाकावर पेट्रोल पंपावर लूटमार करणाऱ्या आरोपीस बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या ४८ तासांत लूटमार करणाऱ्यास राजुरा येथील सोनीयानगरातून ताब्यात घेण्यात आले. अनिल रमेश सकणारे असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. राजुरा मार्गावरील बामणी येथील पेट्रोल पंपावर मोटारसायकलने आलेल्या दोन व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून तेथील कर्मचारी यांच्याकडून २६०० रुपये लुटले आणि वाहनात ५०० रुपयांचे पेट्रोल टाकून पळ काढला. या घटनेची नोंद करून बल्लारपूर पोलीस तपस करीत असताना सिंदेवाही पोलीस ठाण्यांतर्गत दोन व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपधारकाला लुटल्याची घटना घडली. यावेळी नागरिकांनी पाठलाग केल्याने चोरट्यांनी वाहन सोडून पळ काढला. बल्लारपूर पोलिसांनी वाहनांची माहिती घेतली असता तेलंगणा राज्यातील आसिफाबाद येथून चोरी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यावर सोनीयानगरातून अनिल रमेश सकणारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.