• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  महापालिकेच्या एकमध्ये वैरागडे, दोन चौधरी होणार सभापती
  झोन क्रमांक तीनमध्ये भाजप-काँग्रेस नगरसेवकांनी दाखल केले नामांकन

  महानगरपालिकेच्या झोन सभापती निवडणुकीत क्रमांक एकमध्ये भाजपच्या छबूताई वैरागडे, दोनमध्ये खुशबू चौधरी यांचे एकमेव नामांकन आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत या नावांची केवळ घोषणा बाकी आहे. मात्र, तीनमध्ये भाजपकडून सोपान वायकर यांनी, तर काँग्रेसकडून अमजद अली यांनी नामांकन दाखल केले. उद्या निवडणुकीपूर्वी अली यांनी नामांकन मागे न घेतल्यास निवडणूक होण्याची शक्यता आहे.
  महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीनच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी गुरुवारी (ता. ५) मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. दरम्यान, अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १७ नामनिर्देशन पत्रांची उचल झाली होती.
  क्रमांक एकमध्ये भाजपच्या छबूताई वैरागडे, दोनमध्ये खुशबू चौधरी यांनी आज शेवटच्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. विरोधी पक्षाकडून कुणाचेही नामांकन दाखल झाले नाही. त्यामुळे वैरागडे, चौधरी यांची अविरोध निवड होणार आहे. मात्र, झोन क्रमांक तीनमध्ये बसपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. या झोनमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या कमी आहे. त्यातही अंकुश सावसाकळे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून नामांकन सादर केलेल्या अमजद अली यांना बसप, सेना आणि अपक्षांची मदत मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित असल्याचे मनपा वर्तुळात बोलले जात आहे.
  प्रभाग समिती एकसाठी सकाळी ११ वाजता, प्रभाग समिती दोनसाठी दुपारी १२ वाजता, प्रभाग समिती तीनसाठी दुपारी १ वाजता सभा होत आहे. पाच ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी विशेष सभा सुरू झाल्यावर होईल. छाननीनंतर १५ मिनिटांच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर त्याच दिवशी आवश्यकता भासल्यास सर्व नगरसेवकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत मतदान होईल, अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या नगर सचिवांनी दिली आहे.