• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    युवकाचा खून करणा-यास सहा तासांत ठोकल्या बेड्या – मारोडा येथून केली अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

    जुनोना चौक परिसरातील पागलबाबा नगरात युवकाच चाकुने खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षक साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवित पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने अवघ्या सहा तासांत खून करणा-यास सहा तासांच बेड्या ठोकल्या. मूल तालुक्यातील मारोडा येथून अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव पवन रतन पाटील (वय २०), तर मृत्ताचे नाव सोनू राजू चांदेकर (वय २६) असे आहे.
    जुनोना मार्गावरील पागलबाबा नगरात मृतक सोनू राजू चांदेकर हा वास्तव्यास होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पोक्सो, अपहरण, बलात्काराचे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मिस्त्री काम करणारा पवन रतन पाटील हा दुचाकीने जात होता. यावेळी सोनू याने पवनला अडवून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पवनने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांत शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी पवनने चाकूने सोनू याच्यावर वार केले. यात सोनूचा जागीच मृत्यू झाला.
    घटनेनंतर पवनने तेथून पळ काढला. इंदिरानगरातील एका मित्राकडे नवीन कपडे परिधान केले. त्यानंतर मूल तालुक्यातील मारोडा येथील एका मित्राच्या बहिणीकडे रात्री मुक्कामी गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिल्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक खाडे यांनी पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्त्वात पथक गठित केले. खून करून आरोपी मारोडा येथे लपून असल्याची माहिती खाडे यांना मिळाली. त्यानंतर तातडीने पथक मारोडा येथे पोहोचले. पवन पाटील याला अटक करून चंद्रपूर येथे आणून रामनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. ही कारवाई सुरेश केमेकर, मयूर येरणे, जमीर पठाण, अनूप डांगे, प्रदीप मडावी, गणेश मोहुर्ले, अमजद खान, राजेंद्र खनके, कुंदनसिंग बावरी यांच्या पथकाने केली.