• Advertisement
 • Contact
More

  रस्त्यातील खड्यांत भजन आंदोलन
  उखर्डा-नागरी रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मागणी

  वरोरा तालुक्यातील उखर्डा ते नागरी रस्त्याची दुरवस्था झाली. ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे बुजविण्यात यावे, यासाठी अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनाच निवेदने दिली. मात्र, या समस्येकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. अखेर, झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी युवकांनी चक्क रस्त्यातील खड्यांत भजन आंदोलन केले.
  उखर्डा ते नागरी या सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासोबतव पायदळ जाणाऱ्यानांही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
  आमदार प्रतिभा धानोरकर, बांधकाम विभागाकडे निवेदनातून केली होती. खड्डे बुजविण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता.
  त्यानंतर रस्त्यातील खड्यांत बेशरमाची झाडे लावण्याचे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने
  तात्पुरते मुरूम टाकून ठेवले. मात्र, खड्डे बुजविले नाही. खड्डात दिवे लावुन दिवाळी साजरी करण्यात आली. परंतु, आजतागायत या रस्त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला जागे करण्यासाठी रस्त्यातील खड्ड्यात भजन आंदोलन करण्यात आले.
  यावेळी अभिजित कुडे, रूपेश पाल, रंजीत कुडे, साहिल पानतावणे, कृष्णाजी कुचनकर, विजय कुडे, अतुल कोठारे, ऋषिकेश कुडे, राहुल कुडे, योगेश पुसदेकर, प्रशांत कुडे, निखिल पाचभाई, तेजस उरकुडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.