
चंद्रपूर : बैल चराईसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मूल तालुक्यातील टेकडी जंगलात घडली. धांडू वडगू भोयर (वय ६५) असे मृत्ताचे नाव असून आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
टेकाडी येथील धाडू वडगू भोयर हा शेतकरी काल नेहमीप्रमाणे बैल चराईसाठी जंगलात गेला होता. झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. सायंकाळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतला. मात्र, तो कुठेच आढळून आला नाही. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.
आज सकाळी पुन्हा जंगलात शोध मोहीम राबवली असता त्याचा कक्ष क्रमांक ३०५ मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.
गावानजीकच्या शेत शिवारात वाघाचे हल्ले होत असल्याने, शेतकरी-गावकरी भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी हजर झाले. घटनेचा पंचनामा केला आहे