• Advertisement
  • Contact
More

    ५० हजाराची लाच घेतांना , उप विभागिय पोलिस अधिका-याचा रायटर व सुरक्षा रक्षकाला अटक

    बल्लारपुरातील एका दारूविक्रेत्याकडून राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे रायटर राजेश त्रिलोकवार व सुरक्षा रक्षक सुधांशू मडावी यांना ५० हजार रूपयांची लाच स्विकारतांना नागपुर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर मोटरसायकलच्या डिक्कीत १ लाख ६० हजार रूपये मिळाले आहे. अधिकृत दारूविक्री सुरू झाल्यानंतरही या जिल्ह्यात लगतच्या तेलंगना राज्यात अवैध मार्गाने दारू पाठविण्यासाठी तसेच तिकडची दारू महाराष्ट्रात आणण्याचे कार्य पोलीस दलाच्या आशिर्वादाने सुरू असल्याने या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

    बल्लारपुरातील एका बड्या दारूविक्रेत्याला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी पोलिस दलाकडून सातत्याने लाचेची मागणी होत होती. दरम्यान सातत्याने पैसे दिल्यानंतरही पैशाची भूक शमत नसल्याने संबंधित विक्रेत्याने नागपूरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर नागपूर प्रतिबंधक विभागाच्या उपअधिक्षक श्रीमती चाफले व पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे प्रतिबंधक विभागाचे पथक नागपुरातून राजुरा येथे दाखल झाले. राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या कार्यालयाचे समोर एक पान टपरी आहे. तिथे पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार पान ठेल्यावर ५० हजाराची लाच स्विकारतांना उपविभागीय पोलीस अधिकारीचे रायटर राजेश त्रिलोकवार व सुरक्षा रक्षक सुधांशू मडावी या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. कारवाई अजूनही सुरूच आहे. यावेळी सुरक्षा रक्षक मडावी यांची घटनास्थळी मोटरसायकल मिळाली. या मोटरसायकलचे डिक्कीत १ लाख ६० हजाराची रोकड मिळाली. त्यामुळे नेमकी किती लाचेची मागणी केली याचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांची कारवाई वृत्त लिहीस्तोवर सुरू होती.