कोट्यवधींचे नवीन रस्ते बांधायचा आणि काही दिवसातच रस्ता फोडायचा, असा कारभार महापालिकेचा सुरु आहे. त्यामुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या प्रकाराची महापौर राखी कंचर्लावार यांनी गंभीर दखल घेत शहरातील प्रस्तावित रस्त्यांची कामे पूर्ण होण्याआधी अमृत व अन्य कामासाठी खोदकाम करावे. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे खोदकाम करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत.
चंद्रपूर शहरात मागील काही वर्षांपासून अमृत योजनेची पाइप लाइन टाकण्याचे काम केले जात आहे. यासाठी शहरातील अनेक रस्ते फोडण्यात आले आहेत. त्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचासुद्धा समावेश आहे. संबंधित यंत्रणेकडून रस्ता फोडण्यात आल्यानंतर रस्ता बुजविला जात नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधारात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात नुकतेच भजन आंदोलन करण्यात आले होते . तसेच शहरातील अनेक नगरसेवकांनी आमसभेत रस्त्याच्या दुरवस्थेचा विषय आमसभेत उपस्थित केला होता.
