• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  गृहभेटीदरम्यान पाण्यात लार्वा आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार नागरिकांनी घरातील पाण्याचे साठे स्वच्छ ठेवावेत

  धम्मशील शेंडे

  चंद्रपूर, ता. २७ : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रोगराई पसरण्याची भीती असते. डेंगूचा मच्छर साचलेल्या पाण्यात आढळतो. त्यामुळे घरात आणि आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. गृहभेटीदरम्यान पाण्यात लार्वा आढळल्यास नोटीस बजावून दंङात्मक कारवाई करा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिल्या.

  चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत मंगळवारी (ता. २७) घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त विद्या पाटील, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके यांच्यासह स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी यावेळी डेंग्यू प्रतिबंधासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पावसाळा लागताच डास प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत औषध फवारणी तसेच कुलर्सच्या पाण्याच्या टाकीत अबेट द्रावण टाकण्यात येत आहे. यात लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये डेंगू जनजागृतीसाठी व्यापक कार्यक्रम, गृहभेटी, सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, सर्व उपायुक्त, झोन सहायक आयुक्त यांच्यासह स्वतः आकस्मिक भेटी देऊन पाहणी करू, असेही अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.

  मुख्य रस्त्यावरील सफाई सकाळी करून कचरा १० वाजेपूर्वी उचलण्यात यावा, मुख्य मार्गावरील दुभाजकांवर वाढलेली अनावश्यक काटेरी झाडे नियमित काढण्यात यावी, दुभाजकालगतची धूळ नियमित काढण्यात यावी, स्वच्छतेकडे निरिक्षकांनी प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी सूचीत केले आहे.