• Advertisement
 • Contact
More

  कोरची तालुक्यातील उज्वला आल्या परत चुलीवर

  गॅसही गेले आणि रॉकेलही

  कोरची – आशिष अग्रवाल

       महिलांच्या आरोग्याचे रक्षण होईल आणि त्यांचे सक्षमीकरण साधले जाईल, महिलांचे कष्ट सुद्धा कमी होतील आणि स्वयंपाका करिता लागणारा वेळ सुद्धा वाचेल व त्याच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना रोजगार सुद्धा प्राप्त होईल अशा जाहिरात करून तालुक्यातील बीपीएल अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांना उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात आले. केंद्र सरकारने ही योजना 2016 - 17, 17-18, व 18 - 19 या वर्षात राबविली. परंतु सद्यस्थितीत या योजनेचा लाभ घेताना कोरची तालुक्यातील महिला दिसून येत नाही. याचे कारण म्हणजे दिवसेंदिवस गॅस सिलेंडरचे वाढणारे दर केंद्र सरकारने ग्रामीण भागातील महिलांचे जीवन धूर मुक्त करण्याकरिता ही योजना अमलात आणली. परंतु गॅसच्या वाढत्या किमतीमुळे ही योजना आता कागदो पुरतीच मर्यादित झाली असल्याचे दिसून येत आहे.
         काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरातील महिलांना केरोसीन उपलब्ध होत होते. परंतु नवीन नियमानुसार ज्या कुटुंबाच्या नावावर गॅस जोडणी आहे त्यांना केरोसीन मिळणार नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोरची तालुका हा जंगलाने व्यापलेला असून या परिसरात विषारी जीवजंतू चा संचार बघितला जातो व तालुक्यात नेहमी विजेचा लपंडाव होत असल्याकारणाने केरोसीन चा उपयोग कंदील करिता केला जातो. परंतु केरोसिन बंद झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मिळालेला गॅस कनेक्शन हा काही उपयोगाचा नसून निदान केरोसीन तरी पूर्वरत देण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील गृहिणी करीत आहेत. सध्या गॅसचे भाव 900 रुपयांपर्यंत गेल्याने ते नागरिकांना परवडणारे नाही. कोरोनात अनेकांचे रोजगार गेल्यामुळे गॅस साठी पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.