चंद्रपूर : सावली तालुक्यातील व्याहाड खु. उपवनक्षेत्रात व्याहाड बु. येथे 13 जुलैला रात्री घरात शिरून बिबट्याने गंगूबाई रामदास गेडाम (61) या महिलेच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना ताजी असतानाच आज 18 जुलैला सकाळी शेतात काम करीत असलेल्या एका शेतक-यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. विठ्ठल उष्टू गेडाम (60) असे जखमीचे नाव आहे. ही घटना सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणा-या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील सामदा बिटात घडली.
आज रविवारी सकाळी विठ्ठल गेडाम हे शेतात रोवणीच्या कामासाठी जात होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान विठ्ठल गेडाम यांनी हातातील काठीने बिबट्याशी दोन हात करत प्रतिकार केल्याने बिबट्या जंगलाच्या दिशेने पळाला. या हल्ल्यातून थोडक्यात गेडाम बचावले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर प्रकृती अस्वास्थ्य बघून त्यांना पुढील उपचाराकरीता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
