• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करू नये : सौ. राखी संजय कंचर्लावार

  भष्ट्राचारमुक्त कारभाराने गैरव्यवहारी लोकांच्या पोटात दुखणे

  चंद्रपूर : महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणि भष्ट्राचारमुक्त कारभार सुरु झाल्याने गैरव्यवहारी लोकांच्या पोटात दुखणे सुरु झाले आहे. शहरातील विकासकामे विरोधकांना झोंबू लागली आहेत. आगामी निवडणुकीत विरोधकांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने झोपमोड झाली आहे. म्हणूनच न घडलेल्या घटनांचा बाऊ करून प्रसिद्धीची भूक मिटविली जात आहे. त्यामुळे पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करू नये, असे प्रतिउत्तर महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आहे.

  मनपामध्ये प्रशासक बसविण्यात यावा, अशी मागणी एका पत्रकार परिषदेमध्ये काही नगरसेवकांनी केली. त्यावर महापौरांनी सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून मागील सात वर्षे सुज्ञ नागरिकांनी भाजपच्या हाती सत्ता दिली. भाजपची सत्ता असल्यापासून विरोधकांचा “सट्टा”बाजारच बंद झाला. त्यामुळे विरोधकांना “ना टक्केवारी, ना भागीदारी” अशी लाजिरवाणी स्थिती झाली आहे. आता यांना गावात “दादा”गिरीशिवाय कुठलेही दुसरे काम उरलेले नाही. 29 जुलैच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या नगरसेवकाने जो गोंधळ घातला, अशा बेजवाबदार वर्तणुकीमुळे संपूर्ण राज्यात चंद्रपूर महानगरपालिकेची बदनामी झाली. सभेमध्ये पीठासीन अधिकारी असलेल्या महिला महापौरांसमोर अरेरावीची भाषा करणे, टेबल ठोकणे हा सभागृहाचा अवमान नव्हे काय? महिलांच्या सन्मानाच्या बाता मारणारे महिला महापौरांचा अवमान करतात, ही कुठली मर्दुमकी. बेसावध असताना या चालून आलेल्या नगरसेवकाकङून असुरक्षितता वाटल्याने आसनावरून उभी झाली. मात्र, दिवसरात्र टेबलवर ‘बाॅटल’ घेऊन बसणा-यांनी, ‘महापौरांनी बाॅटल भिरकावली’, असे नाट्य रचले. वास्तविकता व्यासपीठावर कुठेही बाॅटल नव्हती. पण, धुंदीत न राहणा-यांना ‘बाॅटल’शिवाय दुसरे काय दिसणार? पत्रकार परिषद घेऊन उठसूठ निरर्थक टीका करणारे गटनेते स्वतः सभागृहात साक्षीदार असताना काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वकीलपत्र घेत आहेत. यातून किती भागिदारी आणि टक्केवारी मिळतेय, हे स्पष्ट करावे. केवळ प्रसिद्धीसाठी घटनेच्या दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप करणे, चुकीचे आहे. आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी शहराच्या विकासाचा “मंगलकलश” जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. मात्र, असूर वृत्तीचे काहीजण विकासाचा हा प्र-दीपक अ’मंगल’ करण्याचे पाप करीत आहेत.

  जो प्रकार घडला, त्यावर पोलिसात रीतसर तक्रार दिल्या आहेत. त्यामुळे न घडलेले प्रकरण रंगवू नये, असेही महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.