लोक मारतील या भौतीपोटी घाबरलेल्या एका युवकाने जीव वाचविण्यासाठी पाण्याने तुडूंब भरलेल्या तलावात उडी घेतल्याची घटना मूल येथे घडली.यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील मंगेश विलास डाखरे हा दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास कामानिमित्त चंद्रपूर येथून गडचिरोळीकडे बसने जात होता. दरम्यान, खाण्यासाठी शेंगदाणे घेण्याकरिता तो मूल बसस्थानकावर उतरला. यावेळी प्रवास करीत असलेली बस सुटली. त्यामुळे तो दुसऱ्या बसची प्रतीक्षा करीत होता.दुसऱ्या बसमध्ये बसताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु, लोकांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला. पकडल्या गेल्याने आता लोक मारतील, या भोतीतून जीव वाचविण्यासाठी त्याने बसस्थानकाला लागूनच असलेल्या पाण्याने तुडूंब भरलेल्या तलावात उडी घेतली.त्यानंतर छाती एवढ्या पाण्यात उभा राहिला. सदर प्रकरणाची माहिती होताच पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड, बावणे, मुंढरे, शफीक, वाहतूक शिपाई नैताम आदी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मंगेशला पाण्याबाहेर येण्यासाठी विनवनी करू लागले. परंतु, मारण्याच्या भीतीने मंगेश बाहेर येण्यास नकार देत होता. पोलिसांनी मारणार नसल्याची ग्वाही दिल्यानंतर तो बाहेर आला.
