• Advertisement
  • Contact
More

    नंदीबैलाच्या सजावटीमधून डेंगू विषयी जनजागृती

    भद्रावती/सुनील बिपटे

    यावर्षीसुद्धा बैल पोळा तसेच तान्हा पोळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने अनेक बालकांनी घरीच राहून तान्हा पोळ्याचा आनंद साजरा केला. याच पार्श्वभूमीवर भद्रावती येथील सुरक्षा नगरातील गावंडे परिवारातील बालकांनी तान्हा पोळा निमित्य घरीच राहून नंदीबैलाची आकर्षक सजावट करून डेंग्यू व मलेरिया या आजारांबाबत जनजागृती केली. सध्या सर्वत्र डेंग्यू मलेरियाची साथ जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक लोकांना यापासून जीवसुद्धा गमवावा लागला. म्हणूनच लोकांमध्ये डेंगूविषयी जागृती निर्माण व्हावी व यापुढे कोणावरही मृत्यूचे संकट येऊ नये या हेतूने तान्हा पोळ्याचे औचित्य साधून गावंडे परिवाराने डेंगूवर आधारित देखावा निर्माण करून या रोगाविषयी घ्यावयाची काळजी , लक्षणे, उपचार त्याचप्रमाणे वैयक्तिक व परिसराची स्वच्छता प्रत्येकाने केली पाहिजे हा संदेश दिला.
    या देखाव्यामध्ये उन्नती अमोल गावंडे हिने “चल चल भाई करे सफाई, कुडा कचरा साफ करे” या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजनातून सर्वांनी स्वच्छता केली पाहिजे असा संदेश दिला. विधी दिपक आसुटकर या बालिकेने परिसर स्वच्छ केला. हार्दिक विशाल गावंडे या बालकाने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा स्वच्छतेविषयीचा संदेश सांगितला. तसेच वेदांती गावंडे हिने ग्रामगीता मधील ओव्यांच्या माध्यमातून सर्वांनी रोग मुक्तीसाठी साफसफाई करणे गरजेचे आहे असे सांगितले. भद्रावती येथील श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते स्व.जगन्नाथजी गावंडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी भरणाऱ्या तान्हा पोळ्यात समाजप्रबोधन देखावे सर्वांसाठी आकर्षक ठरत होते.यंदाही ती परंपरा तशीच सुरू ठेवत कोरोनाचे संकटांत सुद्धा घरूनच डेंग्यू या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली.