• Advertisement
 • Contact
More

  अन्नाअभावी निराधार मायलेकींचा मृत्यू, चंद्रपुरातील हृदय हेलावणारी घटना

  चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. राहत्या घरातच दोघींचा मृत्यू झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. भूकबळीच्या या घटनेनं समाजमन सुन्न झालं आहे. संबंधित घटना शनिवारी उघडकीस आली असून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे

  झेलाबाई पोचू चौधरी आणि माया मारोती पुलगमकर अशी मृत झालेल्या मायलेकींची नावं आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून चौधरी कुटुंब कोठारी येथे याच घरात वास्तव्याला होतं. दरम्यान काही वर्षांपूर्वी पोचू चौधरी यांचं निधन झालं. अलीकडेच मुलगी माया हीच लग्नही झालं होतं. पण तिच्या नवऱ्यानं तिला सोडून दिलं होतं. त्यामुळे या दोघा मायलेकींना कोणाचाही आधार उरला नव्हता.

  या दोघीही भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. तर मागील काही दिवसांपासून झेलाबाई यांना दीर्घ आजारानं ग्रासलं होतं. त्यामुळे मुलगीच गावात भिक्षा मागून आईला आणि स्वत:ला जगवत होती. पण मुलगी मायालाही आजारानं गाठलं. आजारपणामुळे तीही भिक्षा मागायला जाऊ शकली नाही. त्यांच्याकडून कुठलीही कामं होत नव्हती आणि पोटात अन्नही नव्हतं. त्यामुळे अखेर शनिवारी अन्नावाचून दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  घरात आठरेविश्वे दारिद्र्य, दोन वेळचे जेवण मिळेल याचीही शाश्वती नाही. भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या या मायलेकीचा अखेर राहत्या घरात तडफडून मृत्यू झाला आहे. शनिवारी राहत्या घरात दोघींचाही मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात मिळताच सरपंच मोरेश्वर लोहे घटनास्थळी धाव घेत पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली. यानंतर ठाणेदार तुषार चव्हाण आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान त्यांना संशयास्पद असं काहीही आढळलं नाही. दोघी मायलेकींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास कोठारी पोलीस करत आहेत.