• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  ऑनलाईन जुगार चालविणा-या रॅकेटचा पर्दाफाश दहा आरोपींना अटक चंद्रपूरातील तिन आरोपींना अटक

  आष्टी :- मोबाईलवरुन ऑनलाईन जुगार अड्डा चालविणा-या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करीत यातील 10 आरोपींना आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपींकडून जुगाराकरिता वापरात येणारे मोबाईल ताब्यात घेतले आहे. आष्टी, अहेरी व चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या या आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
  तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आहारी गेलेली असून रात्रंदिवस सोशल मिडीयाच्या वापर करीत असल्याने विविध प्रकारच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचेवर करवाई करण्यचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. अशाचप्रकारे ऑनलाईन जुगार खेळणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील छगन निलकंठ मठले (29) रा. ईल्लूर, राजेश विनायक धर्माळे (40), मनोज बाजीराव अडेटवार (40), द्रव्यराव बुधाजी चांदेकर (28), सुमित गौतम नगराळे (29), अहेरी परिसरातील सुरेंद्र बाबुराव शेळके (43) रा. आलापल्ली, संदीप दिलीप गुडपवार (33) रा. नागेपल्ली यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यांच्या सखोल चौकशीअंती चंद्रपूर येथील राकेश अरुण कोंडावार (32), रजिक अब्दूल खालीक खान (45) व महेश बाबूराव अल्लेवार (44) हे मुख्य वितरक ते यूजर आयडी आणि पासवर्डद्वारे एंजट व क्लायंट तयार करीत असल्याची माहिती मिळाली. चंद्रपूर येथील सदर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
  अटक करण्यात आलेल्या सर्व दहाही आरोपींविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 235/2021, भांदवि कलम 420, 465, 468, 471 सहकलम जुगार अधिनयम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्यांचेकडून ऑनलाईन जुगाराकरिता वापरण्यात येणारे मोबाईलही पोलिसांनी यावेळी हस्तगत केले. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
  सदर कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलिस अधीखक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, शिपाई मनोज कुनघाडकर, विश्वनाथ उडाण, वडजू दहीफळे, श्रीकांत भांडे, नितीन पाल, सूरज करपते, उद्धव पवार, बेंगलाजी दुर्गे यांनी पार पाडली.
  बॉक्ससाठी…
  ऑनलाईन प्लॅटमार्फमधून क्रिकेट, फुटबॉलवर सट्टा
  ‘बीईटीक्स वन डॉट को’ आणि ‘एनआयसीई डॉट 7777’ या ऑनलाईन जुगार प्लॅटमार्फच्या माध्यमातून जुगार खेळलया जात होता. यात क्रिकेट, फुटबॉल व इतर बाबीसंबंधी बुकी म्हणून यातील काही आरोपी काम करीत होते. तर चंद्रपूर येथील राकेश कोंडावार, रजिक अब्दूल खालीक खान व महेश अल्लेवार हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात बेकायदेशिररित्या ऑनलाईन सट्टा प्लॅटफार्मचे मुख्य वितरक असून ते यूजर आयडी आणि पासवर्डद्वारे एंजट व क्लायंट तयार करीत होते.
  बॉक्ससाठी…
  आणखी मासे अडकण्याची शक्यता
  या ऑनलाईन जुगाराचे मोठे राज्यस्तरीय रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिसांना तपासाअंती आढळून आले आहे. त्या दृष्टीने पोलिस अधिक तपास करीत आहेत. त्यामुळे या ऑनलाईन जुगार प्रकरण आणखी काही मासे अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.