• Advertisement
  • Contact
More

    पोळ्याच्या पर्वावर पळस वृक्षांची कत्तल

    पर्यावरणाच्या संतुलनात नागरिकांचाच धक्काभद्रावती :परंपरेच्या नावाखाली पोळ्याच्या पर्वावर शहरातील पळसवृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करून येथील नागरिकांनी पर्यावरणाच्या संरक्षणाला मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचविला आहे. या वृक्षतोडीमुळे निसर्गप्रेमींमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे. पोळ्याच्या दिवशी दारासमोर पळसवृक्षांचे मेंढे ठेवण्याची प्रथा आहे. मात्र त्यामागील कोणतेही विधीवत कारण अद्याप कुणालाच माहिती नाही. ही प्रथा पशूपक्षांच्या जीवावर उठली असून दरवर्षी या पळसवृक्षांना मोठ्या प्रमाणावर तोडण्यात येते. त्यामुळे पळसवृक्षांची वाढ खुंटली असून या प्रथेमुळे हे वृक्ष दिवसेंदिवस नष्ट पावत आहेत. परंपरा म्हणून पळसाची लहान डहाळीही दारासमोर ठेवता येवू शकते. मात्र नागरिक शहर परिसरातील मोठमोठे पळसवृक्ष या प्रक्रियेसाठी तोडत असल्यामुळे भविष्यात पळसवृक्ष केवळ चित्रातच दिसतील की काय? अशी भीती निर्माण झालेली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. मात्र स्वतःला सुशिक्षित समजणारे नागरिकच या वृक्षतोडीस कारणीभूत ठरत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या प्रथेवर बंदी आणून व नागरिकांत याबाबत जनजागृती करुन पळस वृक्षांना अभय द्यावे. अशी मागणी आता पर्यावरणप्रेमींकडून केल्या जात आहे.

    प्रतिनिधी – सुनील, भद्रावती