• Advertisement
  • Contact
More

    पोळ्याच्या उत्सवावर यावर्षीही कोरोनाचे सावट

    भद्रावती : वर्षभर राबराब राबून बैल शेतकऱ्यांच्या पदरात धान्याचे माप टाकण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्याची कृतज्ञता म्हणूनच ग्रामीण भागात बैलाला पूजून व त्यांना गोडधोड चारून शेतकरी पोळा सण साजरा करतो. पोळा हा ग्रामीण भागातील सर्वात मोठा सण असून तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाने यावर पाणी फेरले आहे. यावर्षीचा पोळा सुद्धा कोरोनाच्या सावटातच साजरा केला जाणार आहे. त्यामुळे एरवी पोळ्याला असणारी ग्रामीण भागातील मजा गेली आहे. ग्रामीण भागात पोळ्याचा उत्सव मोठा पाहण्यासारखा असतो. यादिवशी बैल आणि शेतकर्‍यांचे आधीच दृढ असलेले नाते आणखीनच घट्ट होत असते. यादिवशी ग्रामीण भागात बैलांच्या शिंगावर रंगीबेरंगी बेगड आणि अंगावर झुल टाकून सजविल्या जाते. इतरांपेक्षा आपली बैलजोडी कशी आकर्षक दिसेल याची जणू स्पर्धाच शेतकऱ्यांमध्ये असते. पोळ्याच्या दिवशी घेतल्या जाणाऱ्या झडत्या हे सर्वांचे आकर्षण असते. या झडत्यांमधून सामाजिक समस्यांवर व्यंगात्मक टीका करून त्या समस्या चव्हाट्यावर आणल्या जातात. या दिवशी शेतकऱ्यांमध्ये झडतीचा चांगलाच सामना रंगतो. दोन्हीकडून कटाब व शह होतो. शेवटी तोरण तोडून पोळा फोडला जातो. त्यानंतर बैलजोडी घरी आणून त्यांची सन्मानाने पूजा करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देऊन बैलांप्रती त्यांच्याकडून शेतीकामात सतत होत असलेल्या मदतीची कृतज्ञता शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे व्यक्त केल्या जाते. आनंदात आपल्या सोबतच आपल्या पाळीव प्राण्यांनाही सहभागी करण्याचा कदाचित पोळा हा एकमेव सण असावा. मात्र या सणांवर यावर्षीही कोरोनाचे सावट असल्याने हा सणही साधेपणाने व योग्य ते निर्बंध पाळून साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पोळ्यानिमित्य होणाऱ्या गमतीजमतीला मुकावे लागणार आहे.