तीर्थक्षेत्राच्या विकासाकरीता 5 कोटींचा निधी देणार
चंद्रपूर : वर्धा व पैनगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या वढा येथील विठ्ठल रुख्मीणी मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी मोठी गर्दी असते. मात्र, कोरोना महामारीमुळे निर्बंध असल्याने यंदाही मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत एकादशीचा सोहळा पार पडला. यावेळी पौराणिक ऐतिहासिक महत्व लाभलेल्या तीर्थक्षेत्र वढा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी विठ्ठल-रुखमणीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.
राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांचे भले व्हावे, कोरोना पासून राज्यातील व देशातील जनतेची मुक्तता व्हावी अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी ना. वडेट्टीवारांनी केली.
यावेळी पवित्र अश्या वढा तीर्थक्षेत्राच्या संपूर्ण व सर्वांगीण विकासासाठी आपण 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा कॉंग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, दिनेश पाटील चोखारे, राजुरेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर व भाविक भक्तांची उपस्थिती होती.
