चंद्रपूर :- ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या ने स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात सहभागी होण्याचे आवाहन जि. प. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्ययकारी अधिकारी विजय पचारे यांनी केले.
स्वच्छता लघुपट स्पर्धेत दोन वेगवेगळ्या भागांतील विषयात लघुपटाची निर्मिती करून स्पर्धकाने वैध व सक्रिय ई-मेल आयडीसह हा लघुपट यूट्यूबवर स्पर्धेच्या अर्जासह 20 जुलै पर्यंत सादर करावा. स्पर्धेसाठी भाग-1 करिता हागणदारीमुक्त लघुपट निर्मिती करायची आहे. यासाठी जैव- विघटनशील कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल आदी विषय आहेत. यासाठी प्रथम पुरस्कार 1 लाख 60 हजार रुपये, द्वितीय 60 हजार रुपये, तृतीय पुरस्कार 3० हजार रुपये ठेवण्यात आला.
भाग 2 साठी भौगोलिक परिस्थितीवर आधारित लघुपट निर्मिती करावयाची आहे. यासाठी विषय. वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्र हे देण्यात आले. याकरिता प्रथम पुरस्कार 2 लाख रुपये, द्वितीय 1 लाख 20 हजार रुपये, तृतीय 80 हजार रुपये, असे असणार आहे. स्पर्धेत बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पचारे यांनी केले आहे.
